

‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
कधीकाळी ‘शेतकरी’ म्हणून स्वतःची ओळख सांगताना स्वाती समाधान कुशारे यांना संकोच वाटायचा. आज १६ एकरांच्या शेतीतून २०२६ मध्ये ६३.३ मेट्रिक टन द्राक्ष उत्पादन घेत त्यांनी ८९.५७ लाख रुपयांची रक्कम मिळवली आहे.
गेल्या तीन वर्षात त्यांचे उत्पादन ७७ टक्के वाढले आहे. नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या स्वातींचा शेतकरी म्हणून स्वतःची ओळख अभिमानाने स्वीकारण्यापर्यंतचा हा प्रवास आहे.
स्वातींचं शिक्षण विज्ञान शाखेतून बारावीपर्यंत झालं. पुढे शिक्षण घेऊन नोकरी करावी, अशी त्यांची इच्छा होती. लग्नानंतर त्या शेती करणाऱ्या कुटुंबात आल्या. सुरुवातीला हा निर्णय त्यांना सहज स्वीकारता आला नाही. त्यांच्यासोबतच्या मैत्रिणी नोकरी करू लागल्या आणि आपणही नोकरी केली असती तर बरं झालं असतं, असा विचार त्यांच्या मनात यायचा.
पण हळूहळू परिस्थितीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला. त्यांनी १६ एकरांच्या द्राक्ष शेतीची जबाबदारी स्वीकारली आणि शेती समजून घेण्यास सुरुवात केली. उत्पादनाचं नियोजन, वेलींची काळजी, बाजारपेठेचा अभ्यास आणि तंत्रज्ञानाचा वापर या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकून घेतल्या. शेतीकडे केवळ परंपरेने करायचं काम म्हणून न पाहता, व्यवसाय म्हणून पाहायला सुरुवात केली.
या बदलाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘आरा’ या नवीन द्राक्ष वाणाचा स्वीकार. आज त्यांच्या शेतातील द्राक्षे स्थानिक बाजारपेठेबरोबरच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही पोहोचतात. परदेशात असलेल्या एका मैत्रिणीनेही या वाणाबद्दल ओळख असल्याचं सांगितलं, तेव्हा आपल्या शेतातील उत्पादन जगाच्या बाजारपेठेत पोहोचत असल्याचा स्वातींना विशेष अभिमान वाटला.
स्वातींच्या मते, शेतीला व्यवसाय म्हणून स्वीकारलं की शेती सोपी वाटायला लागते. या विचारामुळे त्यांच्या कामाची पद्धतही बदलली. आणि त्याचा सकारात्मक परिणाम सुद्धा दिसायला लागला आहे. स्वाती कुशारे यांच्या मागील तीन वर्षांच्या शेती उत्पादन आणि उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २०२४ मध्ये त्यांनी ३५.७ मेट्रिक टन उत्पादनातून ₹३०.७५ लाखांचे उत्पन्न मिळवले, तर २०२५ मध्ये ३५.४ मेट्रिक टन उत्पादनातून ₹३६.४५ लाखांचे उत्पन्न मिळवले. २०२६ मध्ये त्यांनी उत्पादनात मोठी झेप घेत ६३.३ मेट्रिक टन उत्पादनातून ₹८९.५७ लाखांचे उत्पन्न मिळवले. त्यांच्या वाढत्या उत्पादनासोबत उत्पन्नात झालेली ही भरीव वाढ त्यांच्या मेहनतीचे, नियोजनाचे आणि शेतीतील प्रगतीचे उत्तम उदाहरण आहे.
शेतीत महिलांचा सहभाग वाढत असताना शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून निर्णय प्रक्रियेतही महिलांचा आवाज अधिक स्पष्ट झाला आहे. आता महिलांचं मत विचारलं जातं, त्यांच्या निर्णयांना महत्त्व दिलं जातं. स्वातींसाठी हा बदल केवळ त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातला नाही, तर शेतीकडे पाहण्याच्या कुटुंबाच्या दृष्टिकोनात झालेला बदलही आहे.
आज स्वाती गावात राहून शेतीतून मोठं आर्थिक मूल्य निर्माण करत आहेत. त्यांनी आपल्या दोन मुलांनाही आवडत्या क्षेत्रात शिक्षण घेऊन पुन्हा शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून त्यांना एक गोष्ट स्पष्ट झाली आहे—संधी गावातही आहेत; फक्त त्यांना व्यवसायाच्या नजरेने पाहण्याची गरज आहे.
ज्या शेतकरी ओळखीचा कधीकाळी संकोच वाटायचा, तीच ओळख आज स्वाती अभिमानाने स्वीकारतात. त्यांच्या प्रवासात बदल फक्त उत्पादनात किंवा उत्पन्नात झालेला नाही; बदल झाला आहे तो स्वतःकडे आणि शेतीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात.
व्हिडिओ पहा: शेतीतल्या नवदुर्गा — स्वाती कुशारे