‘दिवस थांबून राहत नाही, आपणही थांबू नये. हिंमतीने आल्या दिवसाला सामोरे जावे’ हा जबरदस्त आशावाद सुवर्णा उगले यांच्या जगण्यात भरुन आहे. आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगात सकारात्मक दृष्टिकोन आणि नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करत आलेल्या रणरागिनीची ही कथा.
२००१ मध्ये सिन्नर येथील प्रकाश उगले यांच्याशी सुवर्णाताईंचा विवाह झाला. पोलिओने बाधित झाल्यामुळे प्रकाश उगले यांचा एक पाय नीट काम करत नव्हता. “चांगल्याचा प्रपंच कोणीही करतं, मी अपंगाचा प्रपंच करून दाखवेल” या जिद्दीने सुवर्णा यांनी पतीला कायम साथ दिली. प्रकाश उगले यांचे कुटुंब पिढीजात बिडी कामगार होते. पाच एकर जमीन होती पण ती सर्व जमीन वाट्याने शेती करायला दिलेली होती. त्यावेळी कुडाच्या घरात सासरे, दोन सासू व त्यांचे पती असा परिवार राहायचा. पती अपंग असले तरीही, चांगले शिकलेले होते. लग्नानंतर सुवर्णा यांनी त्यांना बी.एड चे शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले. पुढे संगमनेर तालुक्यामधील एका महाविद्यालयात तासिका तत्वावर प्राध्यापक म्हणून काम करत होते. कुटुंबात आर्थिक अडचणी तर नेहमीच होत्या. त्यावेळी वाट्याने दिलेल्या शेतीमधून फारसे काही उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे सुवर्णा यांनी घरची जमीन स्वतः कसण्याचा निर्णय घेतला. यासोबतच दुग्धव्यवसायाची कल्पना त्यांना सुचली व त्यांनी घरी दुग्धव्यवसाय सुरू केला. यातही पुढे काही अडचणी आल्या. पतीच्या नोकरीसाठी त्यांना पाच लाख रुपये भरावे लागले,यासाठी त्यांना गायी विकाव्या लागल्या. त्यामुळे त्यांचा दुग्ध व्यवसाय बंद पडला. मात्र सुवर्णा यांनी शेतात प्रयोग करणे कधीच सोडले नाही.
शेती करत असताना पाण्याची अडचण भासत होती. शेतात एक विहीर होती पण तिला आणखी खोल करणे गरजेचे होते. त्या विहिरीचे काम त्यांनी पूर्ण केले. २००५ साली विहिरीला लागलेल्या पाण्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास सुरवात झाल्याचे ते सांगतात. सोबत नवीन गायी घेऊन त्यांनी दुग्धव्यवसायाला नव्याने सुरवात केली.
सुवर्णा यांनी २००९ साली डाळिंब लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी डाळिंबाची रोपे देखील आणली. पण त्यावेळी सासऱ्यानी यात नुकसान होईल या भीतीने त्यास नकार दिला. विकत घेतलेली डाळींबाची रोपे त्यांना परत करावी लागली. पण धीर न सोडता २०१० साली त्यांनी संसऱ्यांला डाळिंब लागडीसाठी तयार केले. डाळिंब लागवडीनंतर खऱ्या अर्थाने कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीत चांगला बदल घडून आला. यासाठी पती प्रकाश उगले हे सुवर्णा यांना वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन करत होते. त्यावेळी अतिशय मेहनत घेऊन त्यांनी डाळिंबाचं निर्यातक्षम उत्पादन घेतलं. या सगळ्यात दुग्ध व्यवसायाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. शेतीत बदल होत गेला तसं त्यांनी शेतात नवीन बंगला बांधला.
आज त्यांचा ६ गायींचा दुग्धव्यवसाय उत्तम सुरु असून, दूध काढण्यासाठी इलेक्ट्रॉनिक यंत्र देखील आहेत. दररोज ११० लीटर दूध वक्री या मध्यमातून केली जाते. सोबत त्यांनी शेळीपालन देखील चालू केले आहे. शेतीतून येत असलेल्या उत्पन्नातून नुकतीच त्यांनी ३ गुंठे जमीन विकत घेतली आहे. आता त्यांनी द्राक्ष शेतीत प्रयोग करणे सुरू केले आहेत आणि त्यातही यशस्वी होऊ असा त्यांचा निर्धार आहे. शेती सोबत पूरक व्यवसाय करताना त्यांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. आज मुलं देखील उच्चशिक्षण घेत आहेत. या सर्व प्रवासात तुमचं प्रेरणास्थान काय आहे असे विचारलं असता, "प्रत्येक यशस्वी शेतकऱ्याचा बांध हे आमचं प्रेरणास्थान आहे आणि जेव्हा जेव्हा आम्हाला असा यशस्वी शेतकरी भेटतो, तेव्हा आम्ही त्याच्या बांधावर नक्की भेट देतो" असं सुवर्णा सांगतात.