सुरुवातीला सरळ वाटणारा रस्ता नंतर आव्हानांची अनेक वळणे घेऊन येत राहतो. आपण हार न मानता चालत रहावे हा थेट संदेश देणारी शोभा जाधव यांची संघर्षकथा विलक्षण प्रेरणादायी आहे.
पतीची नोकरी, घर, मुले असे सगळे आनंदाने चालू असतांना पतीला अचानक अर्धांगवायूने गाठले. त्यात नोकरीही गेली. शोभा जाधव यांची खरी लढाई इथून पुढे सुरु झाली. कुटुंबाचा आर्थिक कणा कोलमडल्यानंतर स्वत:च कणा बनणे, त्यासाठी शेतीकडे वळणे, घर सांभाळणे, पतीचे आजारपण सांभाळणे, मुलांचं शिक्षण पूर्ण करणे, स्वत:ला झालेल्या सर्पदंशासारख्या संकटाशीही दोन हात करणे, अशी सतत आव्हानांची मालिका शोभा यांच्या समोर होती. खचून जायचे नाही तर लढत राहायचे हा एवढा एकच पर्याय त्यांच्या समोर होता.
वर्ष २०११-१२ चा हा काळ मोठा कसोटीचा होता. पतीचे आजारपण, त्यातील चढ उतार हे सोबतीला होतेच. मध्येच एकदा शेतकाम करतांना त्यांना सर्पदंश झाला. वाटले सगळे संपले आता. पण त्या याही संकटातून बाहेर आल्या. पण पतीसह सगळ्यांच्या मनात भिती बसली. ही जागा सोडून पुन्हा दुसरीकडे शेत-जमीन पहायची असे ठरले. लवकरच निगडोळ भागात तशी शेत-जमीनही मिळाली. नव्या ठिकाणी पुन्हा नवी लढाई सुरु झाली. पाण्यासाठी शेततळे, बोअरवेल व पाईपलाईन केली. यात जवळचे सगळेच भांडवल खर्च झाले. त्यामुळे पुन्हा नव्या हंगामासाठी कर्ज काढले.
नवीन द्राक्षबागेची उभारणी करतांना मंडप व तार बांधणीचे काम सुरु होते. मात्र मजुरांना द्यायलाही जवळ पैसे नव्हते. तेव्हा शोभाताईंनी पतीसह स्वत: ४ क्विंटल तारेची बांधणी केली. अशा आव्हानांची त्यांना आता जशी सवयच झाली होती. यानंतर मात्र द्राक्ष शेतीतून चांगले उत्पादन मिळाले. त्यांच्या कष्टाला फळ आले. मुलांचं शिक्षण व लग्नही झालीत. घरी आलेल्या सुना त्यांच्या दृष्टीने मुलीच होत्या. त्यामुळे सुनांच्या उच्च शिक्षणासाठी स्वत: शोभाताईंनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या स्वतंत्र करिअरच्या स्वप्नांनाही वाव दिला. आज त्यांनी हवामान बदलास पूरक ‘आरा -१५’ नवीन द्राक्ष प्रजातीची लागवड करून, सोबत सोलार ड्रायरचे देखील काम सुरू केले आहे.
संघर्षाचा खूप मोठा पल्ला शोभाताईंनी पार केला आहे. या टप्प्यावर ‘शेती हीच खरी लक्ष्मीआहे‘ अशी शेती-माती विषयीची कृतज्ञता आणि एक कृतार्थतेची भावना त्या मनापासून व्यक्त करतात. त्यांचा प्रवास शेती-मातीतील अनेकांना प्रेरणा देणारा आहे.