

खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर!
कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली… आता मातीत भविष्य घडवते!
कॅनोइंगमध्ये पदकं मिळवणाऱ्या पूजांनी नोकरी सोडून ३.५ बिघे द्राक्षबागेची जबाबदारी स्वीकारली. सुरुवातीला हवामान, बुरशी आणि कुजण्यामुळे पिकाचं नुकसान झालं; पण शिकत राहून त्यांनी द्राक्षांची गुणवत्ता सुधारली आणि गेल्या वर्षी सुमारे ९ लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं. आज त्यांच्या द्राक्षांची निर्यात युरोपात होत आहे.
पूजाची गोष्ट तिच्या खेळापासून सुरू करायची की शेतीपासून, हा प्रश्न पडतो. कारण तिच्या आयुष्यातला प्रत्येक टप्पा तिला पुढच्या आव्हानासाठी तयार करत गेला.
अवघ्या दीड वर्षांची असताना पूजाने आईला गमावलं. आईची माया समजण्याच्या आधीच तिची साथ निघून गेली. वडील, आत्या आणि लहान भावासोबत ती मोठी झाली. लहानपणापासूनच परिस्थितीशी जुळवून घेत पुढे जाण्याची सवय तिला लागली.
शिक्षण घेत असतानाच तिला खेळाची आवड निर्माण झाली. पिंपळगावच्या के. के. वाघ कॉलेजमध्ये एम.कॉम.चे शिक्षण घेत असताना तिने कॅनोइंग या जलक्रीडा प्रकाराचा सराव सुरू केला. पाण्यात बोट चालवताना तिने अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. दिल्ली, भोपाळ आणि बिलासपूर येथे महाराष्ट्र आणि पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आणि राज्यस्तरावर पदकंही मिळवली.
पण खेळासोबतच तिच्यासमोर घरच्या शेतीचीही जबाबदारी होती.
शिक्षणानंतर पूजाला नोकरीची संधी मिळाली आणि काही काळ तिने नोकरीही केली. मात्र वडिलांची तब्येत आणि घरच्या शेतीची परिस्थिती पाहता तिने एक ठोस निर्णय घेतला—नोकरीपेक्षा आता घरच्या शेतीला वेळ द्यायचा.
तिने नोकरी सोडली आणि साडेतीन बिघ्यांच्या द्राक्षबागेची जबाबदारी स्वतःच्या हातात घेतली.
शेतीचा अनुभव मर्यादित असल्याने तिला अनेक गोष्टी नव्याने शिकाव्या लागल्या. ट्रॅक्टर चालवण्यापासून औषध फवारणी, पाणी व्यवस्थापन आणि द्राक्षबागेची निगा राखण्यापर्यंतची कामं ती स्वतः करू लागली.
मात्र द्राक्षशेतीने तिला लगेच यश दिलं नाही. कधी हवामान बदललं, कधी बुरशी किंवा कुजव्याचा प्रादुर्भाव झाला, तर कधी तयार झालेल्या द्राक्षांचं नुकसान झालं. मेहनत करूनही अपेक्षित उत्पादन मिळत नव्हतं.
पण प्रत्येक नुकसानानंतर पूजाने शेती सोडण्याचा विचार करण्याऐवजी एकच निर्णय घेतला—“शेती करायची तर ती नीट आणि शिकूनच करायची.”
तिने शेतीकडे अधिक बारकाईने पाहायला सुरुवात केली. फवारणीची योग्य वेळ, औषधांचं प्रमाण, पिकासाठी आवश्यक पीएच संतुलन आणि द्राक्षांची काढणी करण्यापूर्वी घ्यायची काळजी, या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास तिने केला. अनुभवातून चुका समजून घेतल्या आणि पुढच्या हंगामात त्या टाळण्याचा प्रयत्न केला.
हळूहळू तिच्या मेहनतीचा परिणाम दिसू लागला. द्राक्षांची गुणवत्ता सुधारली. बाजारपेठेच्या गरजा समजून घेत उत्पादनावर लक्ष दिलं आणि तिच्या शेतातील द्राक्षं युरोपच्या बाजारपेठेत पोहोचली.
गेल्या वर्षी पूजाने द्राक्षशेतीतून ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले.
मात्र पूजासाठी शेतीचं यश केवळ उत्पन्नापुरतं मर्यादित नाही. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असं तिला वाटतं. प्रत्येक शेतकरी स्वतंत्रपणे माल विकत असेल तर दर ठरवताना त्याची ताकद कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन माल विकावा, बाजारपेठ समजून घ्यावी आणि योग्य दर मिळवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असा तिचा ठाम विचार आहे.
आज पूजा एम.कॉम. आहे, खेळाडू आहे आणि आपल्या कुटुंबाची शेतीही सक्षमपणे सांभाळते. तिच्या आयुष्यात संघर्ष कमी झालेले नाहीत; मात्र त्या संघर्षांकडे पाहण्याची तिची दृष्टी बदलली आहे.
पूजाने परिस्थिती बदलण्याची वाट पाहिली नाही.
तिने निर्णय घेतले, शिकत राहिली आणि स्वतःची वाट स्वतः तयार केली.
व्हिडिओ पहा: शेतीतल्या नवदुर्गा — पूजा गवळी