शेतकरी, व्यावसायिक, उद्योजिका, गृहीणी, पालक अशी नानाविध रुपे असली तरी धारण करणारी 'ती' एकच आहे. लखमापूरच्या मोहिनी मोगल या विविध भूमिका लीलया पार पाडत आहेत. आपल्या शेती उद्योगाचे व्यवस्थापन एक हाती सांभाळण्याबरोबरच त्यांनी पतीच्या गुळ उत्पादन व्यवसायालाही आधार दिला आहे.
शेतीकडे केवळ एक उदरनिर्वाहाचे साधन म्हणून न पाहता त्यात एक आवड म्हणून मेहनत करून याच शेतीला व्यवसायाची जोड देऊ पाहणाऱ्या नवदुर्गेची ही कथा. माहेरी शेतीत कुठलाही अनुभव नसताना सासरी येऊन शेतीकामात स्वतःला झोकून देऊन, आज ३० एकर शेती मोहिनी या एकट्याने पाहत आहेत. घरच्या शेतीचे व्यवस्थापन ते घरच्या गुळाच्या व्यवसायासाठी विक्री व्यवस्था उभी करणाऱ्या मोहिनी यांचा प्रवास आज जाणून घेऊया.
१९९६ साली लखमापूर येथील वाल्मिक मोगल यांच्याशी मोहिनी यांचा विवाह झाला. सासरी शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने साहजिकच मोहिनी यांना शेतीकामास सुरुवात करावी लागली. सुरुवातीच्या काळात यामध्ये अडचणी आल्या कारण लग्नापूर्वी शेतीकामाचा कोणताही अनुभव त्यांना नव्हता. परंतु सासऱ्यांनी मोहिनी यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात दीर आणि सासरे यांच्यासोबत त्या शेतीत हातभार लावू लागल्या. जस-जसे त्या शेतीकाम शिकत गेल्या तसं शेतीविषयीची त्यांची आवड वाढत गेली. घराजवळचे क्षेत्र सोडून अन्य ठिकाणी असलेल्या ११ एकर द्राक्षबागेची जबाबदारी त्यांनी स्वत: घेण्यास सुरवात केली. ही जबाबदारी पेलनं हे मोठं आव्हान असल्याचे त्यांना जाणवले. तसेच मजुर टंचाई ही मोठीच समस्या होती. मजूर नसतांना सर्व कामे स्वत: करण्यावर त्यांनी भर दिला. हाताने नळी ओढून फवारणी करणे असो की ट्रॅक्टरच्या साह्याने फवारणी किंवा मशागत करणे असो, अशा विविध शेती कामातील कौशल्ये त्यांनी प्राप्त केली.
पती वाल्मिक यांनी शेतीला जोड म्हणून २००६ पासून गुळ निर्मितीचा व्यवसाय सुरु केला. पतीच्या व्यवसायात विक्रीची जबाबदारी मोहिनी यांनी स्वत:हून घेतली. गावातील महिलांना एकत्र करुन त्यांनी बचत गट सुरु केला. या गटाच्या माध्यमातून जिल्हा, विभागीय पातळीवरील कृषि प्रदर्शनात स्टॉल उभारुन त्यांनी गुळाची मार्केटींग केली. नाशिक, मुंबई, जळगाव अश्या अनेक भागात जाऊन त्यांनी विक्रीसाठी सुरुवात केली. आजमितीस महिन्याला ३ ते ४ टन गुळाची विक्री बचत गटाच्या माध्यमातून होत आहे. गुळाच्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा शेतीच्या प्रगतीसाठी उपयोग होऊ लागला आहे. दरम्यानच्या काळात काही कठीण प्रसंग देखील आले. कोरोना काळात द्राक्ष विक्रीची मोठी समस्या तयार झाली होती. त्यावेळी द्राक्ष बेदाणे प्रक्रिया करुन त्यांनी या अडचणींवर मार्ग काढला. मजूर टंचाई हेच आता शेतीपुढील मोठं आव्हान आहे. भविष्यात मजूर व्यवस्थापनासाठी नवीन तंत्रज्ञान आणण्याचे त्यांचे स्वप्न आहे. माहेरी शेतीकामाचा अनुभव नसूनही सासरी त्या खऱ्या अर्थाने शेती-मातीशी एकरुप झाल्या आहेत. त्याद्वारे त्यांची शेती प्रगतीपथावर नेण्यात मोलाची भूमिका त्या बजावत आहेत.