परिस्थिती कितीही प्रतिकूल असो आपण हिंमत कधीच हारायची नसते, हे वाक्य स्वत:च्या जगण्यातून मंदाबाईने सिद्ध केले आहे. कूसळही न उगवणाऱ्या खडकाळ जमिनीत त्यांनी बाग फुलवण्याचा ध्यास घेतला, तेव्हा त्यांना हे अशक्य असल्याचे सांगितले. मात्र चिवट मंदाताईंनी हिंमतीने त्यांचा ध्यास पूर्णत्वास नेला.
लहानपणापासूनच मंदाबाई जिद्दी आणि कष्टाळू. आईला टीबीचे निदान झाले आणि त्यातच तिचे निधन झाले. लहान वयातच त्यांचे मातृछत्र हिरावले. मोठी बहिण म्हणून अचानक लहान दोन भावडांची जबाबदारी आली. ती मोठ्या कष्टाने पार पाडली. १९७७ मध्ये त्यांचे नाशिक जिल्ह्यातील ओढा येथील जयराम पेखळे यांच्याशी लग्न झाले.
सासरी ६ दीरांसह ३५ लोकांचे कुटुंब होते. परिस्थिती अतिशय हालाखीची होती. वाटणीनंतर मंदाबाईच्या वाट्याला अडीच एकर जमीन आली. पती वीज महामंडळात नोकरीस होते. केवळ पतीच्या पगारावर चरितार्थ चालविणे अवघड जात होते. ४ अपत्यांची जबाबदारीही होतीच. मंदाबाईंनी शेतीतून उत्पादन घ्यायचे ठरवले. मात्र वाट्याला आलेल्या खडकाळ जमिनीतून उत्पादन घेणे हे मोठे आव्हान होते. त्यांनी द्राक्षबाग लावायची ठरवली व त्या कामाला लागल्या. या जमिनीत काहीही होणार नाही. तुला हे जमणार नाही असे सांगत अनेकांनी त्यांना शेती करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र पदर खोचून निर्धाराने त्या मैदानात उतरल्या होत्या. कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही असे त्यांनी ठरवले होते.
द्राक्षबाग लावण्याआधी जमिनीला लागवडीयोग्य करणे आवश्यक होते. खडकाळ जमीन, आधीपासून असलेले निवडुंगाचे रान ते वीजेची गैरसोय आणि पाण्याची कमतरता अशी अनेक आव्हाने समोर होती. हे बदलायचे तर पुरेसे मनुष्यबळ हवे. त्यासाठी भांडवलही हवे. मात्र जवळ काहीही नव्हते. मुलांना हाताशी घेऊन मंदाबाईंनी खडक फोडण्यास सुरुवात केली. निवडुंगाचे रान साफ केले. हे काम बरेच दिवस चालले. सततच्या मेहनतीतून त्यांनी जमिनीला लागवडीयोग्य केले.
द्राक्षबागेची लागवडही झाली. पाणी टंचाई आणि वीजेची अनुपलब्धता या समस्या मात्र प्रत्येक टप्प्यात कसोटी पाहत राहिल्या. बऱ्याचदा तर फवारणीसाठीही दूर नाल्यावरुन पाणी वाहून आणावे लागले. दुसऱ्याच्या शेतातील वीज जोडून फवारणी केली. यांत्रिकीकरणासाठीही भांडवल नव्हते तेव्हा यंत्राशिवायही बरीचशी कामे करण्यावर भर दिला. पहिल्या दोन वर्षात बागेने बाळसं धरलं. पहिल्या वर्षीच्याच उत्पादनातून ३ लाखांचे उत्पन्न मिळाले. ही घटना उत्साह वाढविणारी ठरली. मग मात्र पुढील काळात शेतीतील गोडी वाढतच राहिली. यातून केवळ घरच्या परिस्थितीला आधारच मिळाला नाही तर शेतीही फायद्याची होत गेली. शेतीतील उत्पन्नातूनच त्यांनी सिंचनाची सोय केली. ट्रॅक्टरसहीत अनेक यंत्रांची, साधनांची खरेदी केली. वर्ष २००९ मध्ये तर आपल्या शेतीतील उत्पन्नातून १ एकर जमीनही खरेदी केली.
वर्ष २०१३ पासून ‘सह्याद्री फार्म्स’शी जोडले गेल्यानंतर शेतीतील प्रगतीचा वेग अजूनच वाढला आहे. बाजाराचा आधार मिळाला. निर्यातक्षम उत्पादन घेण्याकडे त्यांचा कल वाढत गेला. सुरुवातीला थॉमसन, मनिकचमन या द्राक्ष जातींची लागवड केलेली होती. त्यानंतर ‘आरा-१५’ या नव्या वाणांची लागवडही त्यांनी केली आहे. आज मुले, सुना, नातवंडे यांनी घर भरले आहे. मंदाबाईंच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे संस्कार संपूर्ण कुटुंबावर झाले आहेत. त्यातूनच पेखळे कुटुंब सतत प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. मंदाबाईकडून प्रेरणा घेऊन परिसरातील शेतकरी कुटुंबेही शेतीत नवनवे प्रयोग करीत आहेत.