या बहिणाबाईंच्या कवितेच्या ओळीसारखे इंदुमती वडजे यांनी दु:खात, संकटात अडकून न पडता त्यातून हिंमतीने मार्ग काढला. पतीच्या निधनानंतर सर्व दुःख बाजूला ठेऊन आपल्या मुलांसाठी १४व्या दिवशी शेतावर जाऊन मोठ्या धीराने उभं राहत काम करणाऱ्या नवदुर्गेचा हा प्रवास.
१९७८ मध्ये इंदुमती यांचा आंबेवणी येथील लखुजी वडजे यांच्यासोबत विवाह झाला. पती त्यावेळी कादवा कारखान्यात कामाला होते. १९८८ साली कुटुंब विभक्त झाले. त्यानंतर दोन मुले आणि पती-पत्नी असा चार लोकांचा संसार सुरू होता. कुटुंबाच्या वाट्याला आलेल्या शेतीमध्ये ऊस, कांदे, सोयाबीन या पिकांची लागवड केलेली होती. इंदुमती ह्या कुटुंबासोबत शेतीची देखील जबाबदारी पाहत. मात्र अचानक आलेल्या एका संकटामुळे हे सर्व चित्र पालटले. २००१ साली लखुजी वडजे यांचे गंभीर आजाराने निधन झाले. इंदुमती यांनी यांच्या आयुष्यातील एक मोठा आधार गमावला.
त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा नववीत तर लहान मुलगा सातवीत शिकत होता. पतीच्या अकाली निधनाने कुटुंब आणि शेतीची जबाबदारी एकट्या इंदुमती यांच्यावर येऊन पडली. या घटनेतही त्या अधिक धीराने परिस्थितीला सामोरे गेल्या. पतीच्या निधनाचा दुखवटा बाजूला ठेऊन, त्या लगेचच १४ व्या दिवशी शेतीचे काम पाहू लागल्या. आजूबाजूच्या लोकांनी तेव्हा खूप नावे ठेवली, परंतु आपल्या कुटुंबाच्या भाकरीचा प्रश्न आपल्यालाच सोडवायचा आहे. ही एकमेव जाणीव मनाशी होती. दोन मुलांपैकी त्यांच्या लहान मुलाने शेती सांभाळण्यासाठी शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. तोही इंदुमती यांना शेतीच्या कामात मदत करू लागला.
२०१४ पर्यंत जमीन त्यांच्या नावे नसल्याने बँकेकडून कर्ज काढायला अडचणी येत होत्या. शेतीसाठी भांडवल हा एक मुख्य घटक आहे त्यामुळे शेतीकामासाठी सतत लागणारे पैसे ते नातेवाईकांकडून उसनवारी करुन घेत असत. उत्पन्न आले की पैसे परत करत. हे कर्जाचे दृष्टचक्र अनेक वर्ष सुरूच राहिले. मात्र त्यांनी हार मानली नाही. आलेल्या प्रश्नांना तोंड देत राहिल्या. २०१४ साली शेतजमीन त्यांच्या नावे झाली आणि अनेक अडचणींवर मार्ग निघत गेला. त्याच वर्षी त्यांनी द्राक्ष लागवड केली आणि त्यातून चांगले उत्पन्न येऊ लागले. हळू हळू जीवनात आर्थिक स्थैर्य येत होते. सगळं सुरळीत सुरू असताना २०२० साली त्यांच्या समोर पुन्हा नवे संकट उभे राहिले. अवकाळी पावसाने त्यांची संपूर्ण द्राक्षबाग भुईसपाट झाली. अनेकांनी त्यांना बाग काढून टाकण्याचा सल्ला दिला.
इंदुमती यांना त्यांच्या नियोजनावर विश्वास होता. ही द्राक्षबाग पुन्हा उभी करत पुढच्याच वर्षी त्याच द्राक्ष बागेतून चांगले उत्पन्न त्यांनी घेतले. शेती म्हणलं कि चढउतार हे येणारच. पण अशा अनेक संकटाना त्या हिमतीने तोंड देत उभ्या राहत होत्या. त्यांच्या संघर्षाला आज यश आलंय. मोठा मुलगा आज शिक्षक आहे व लहान मुलगा उत्तमरीत्या शेती सांभाळतो. दोन्ही मुलांची लग्न झाली आहेत. इंदुमती म्हणतात कि "कामाला आणि कष्टाला कधीच पर्याय नसतो तुम्ही कष्ट करत राहा एक दिवस यश आपोआप मिळेल". आयुष्यात आलेल्या अनेक संकटांत आपल्या शेतीकडे दुर्लक्ष न करता त्याच शेतीच्या आधारावर कुटुंब उभारणी करणाऱ्या इंदुमती यांचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे.