कोरोनामुळे शेतीचे पर्यायाने शेतकऱ्यांचे अनेक टप्प्यांत अतोनात नुकसान झाले. या अवघड काळातच खऱ्या अर्थाने मुल्य साखळ्यांचे महत्व अधोरेखित झाले. मुल्यसाखळ्या व्यवस्थित उभ्या राहिल्या नाही तर अशी संकटे सरकारही हाताळू शकत नाही.याची जाणीव सरकारसहीत सर्वच घटकांना झालीय.. कोरोना संकटाला स्विकारुन आपण चालत असतांनाच एकूणच व्यवस्थेच्या उभारणीसाठी केंद्र सरकारकडून २० लाख कोटीचे पॅकेज जाहीर झाले. त्यानंतर लगेचच जीवनावश्यक कायद्यात बदल करण्याचे सुतोवाच करीत मुक्त बाजार व्यवस्थेला गती देण्याची घोषणाही झाली. पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटीचा निधी देण्याचेही जाहीर करण्यात आले. ही महत्वपूर्ण घटना आहे. सरकारमधील धुरीणांनाही या प्रमाणे शेतीची जाणीव झाली हे मोठंच दिलासादायक आहे. यामुळे शेती आणि ग्रामीण व्यवस्थेच्या पुनर्रचनेला मदत मिळणार आहे. वर्षानुवर्षे कोंडलेल्या बाजार व्यवस्थेला यातून पूर्ण स्वातंत्र्य मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
शोषणाच्या व्यवस्था मोडकळीस..
वर्षानुवर्षे उभ्या राहिलेल्या शेतीच्या शोषणाच्या व्यवस्था कोरोनाच्या धक्क्याने कोलमडायला सुरुवात झाली आहे. जागतिकीकरणानंतरच्या मुक्त अर्थ व्यवस्थेत बंधने कमी होणे व शेतकऱ्यांना बाजार स्वातंत्र्य मिळणे अपेक्षित होते. ते आता खऱ्या अर्थाने होतांना दिसत आहे. शेतीत व्यवसायाच्या प्रत्येक पिकाच्या इंडस्ट्रीज तयार होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या नियंत्रणातील अशा साखळ्या निर्माण होण्यासाठी अनुकूल असं चित्र होतांना दिसत आहे. हे आता गतीने पुढे गेले तर एकूणच शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेचं चित्र बदलणार आहे.
मार्केट रिफॉर्मच्या दिशेने..
कोरोनाच्या संकट काळात भाजीपाला, फळांच्या बाजारात भारतात ज्या प्रमाणात पेचप्रसंग उभा राहिला. त्या प्रमाणात अमेरिका, युरोपीय व इतर प्रगत देशांत इतकी अडचणीची स्थिती झाली नाही. याचे कारण त्या देशातील शेतमाल बाजारातील सुसंघटीत (ऑर्गनाइज्ड) रिटेल चेन (साखळी) हे आहे. प्रगत देशातील 80 टक्के शेतमाल रिटेल साखळीतून खरेदी व विक्री केला जातो. आपल्याकडे हे प्रमाण उत्पादनाच्या जास्तीत जास्त 2 टक्के आहे. जी अवस्था जी रिटेलची, तीच प्रक्रियेचीही आहे. शेतमाल बाजार व्यवस्थेत आमुलाग्र बदल करण्याची हीच वेळ आणि संधी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा धडा आपल्याला शिकावाच लागणार आहे. सरकारने मागील 4-5 वर्षांपासून शेतमाल बाजारातील नियमन काढून या बाजारव्यवस्थेत रिफार्म (महत्वपूर्ण) बदल करण्याच्या दिशेने पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. त्या कार्यक्रमास आता गती मिळणे आवश्यक आहे.
बाजार स्वातंत्र्याची घोषणा
कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. तितक्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यातून एक जाणीव तयार झालीय की जर अशा मुल्यसाखळ्या व्यवस्थित उभ्या राहिल्या नाही तर अशी संकटे सरकार हाताळू शकत नाही. एकीकडे शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आहे.तर, दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्राहकवर्गही आहे. तरीही दोन्ही बाजूंना याचे मोठे फटके बसले याचे कारण तितक्या क्षमतेच्या मुल्यसाखळ्या उभ्या राहू शकल्या नाही. दुधाचे उदाहरण पाहिले तर या उत्पादनाला या काळात त्या प्रमाणात फटके बसले नाहीत. दुधा सारख्याच मुल्य साखळ्या प्रत्येक पिकामध्ये उभ्या राहणं ही काळाची गरज आहे. हे आता सर्वांनी ओळखलं आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच शेतीला केंद्रस्थानी ठेवून शेतीतील विविध घटक मजबूत करण्याची तसेच बाजार व्यवस्था अधिक खुली करण्याची घोषणा केली आहे. ही फार सकारात्मक घटना आहे. शेतीला आता सावरायला हवे याची हे सरकारमधील सर्व धुरीणांना पटलंय. केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा हे त्याचे ठळक उदाहरण आहे. आतापर्यंत यावर बोलणं खूप झालंय. आता प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आखला जातांना दिसत आहे. शेतीच्या विकासात पायाभूत सुविधांसाठीची गुंतवणूक करण्याच्या दिशेने सरकार पाऊले टाकत आहे. बाजार मुक्त करणे. त्यात ई-कॉमर्स सारख्या आधुनिक संकल्पनांना संधी देण्याबाबत सरकारकडून जाहीर मांडणी होणे यावरुन असं दिसतंय आता हेच आपल्या पुढील भवितव्य असणार आहे.
बदलाची गती वाढण्याची आशा
तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर होणं. या तंत्रज्ञानाच्या ताकदीवरच या नव्या व्यवस्था उभ्या राहणं. शेतकऱ्यांपासून ग्राहकांपर्यंतच्या सगळ्या मुल्य साखळ्या उभ्या राहणं. यातून शेतकरी ऑर्गनाइज्ड (संघटीत) होत जाणं. त्यासोबत बाजारपेठेतील रिटेलच्या यंत्रणाही त्याच गतीने ऑर्गनाइज्ड होत जाणं. हे सगळे परस्परांशी जोडल्यामुळे नवे हाय-वे (महामार्ग) तयार होणं. जुने रस्ते फोडून जेव्हा नवीन रुंद मार्ग तयार होतात. त्यातून ज्या प्रमाणे वाहनांचा वेग वाढतो. त्या प्रमाणे शेतीतील बदलांचा वेग आता वाढेल असे दिसतेय. शेतीत या ऑर्गनाइज्ड व्हॅल्यू चेन जशा वाढू लागतील. शेतीतील सर्व घटकांना गती मिळेल.
खेड्याकडे चला..
यात सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणं. त्यातून शेती योग्य पध्दतीने शाश्वत उत्पन्न व्यवस्थेच्या दिशेनं जाणं. ग्रामीण भागातच रोजगार तयार होणं. जे आपण प्रत्येक जण बोलत होतो. ते आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात साकारायला लागेल. हीच या परिस्थितीची खरी उपलब्धी असणार आहे. महात्मा गांधींनी ‘खेड्याकडे चला‘ हा संदेश दिला होता. तो आता प्रत्यक्षात येऊ पाहत आहे. खेड्यांच्या आणि शेतीच्या स्थितीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची अभ्यासपूर्ण मांडणी प्रसिध्द आहे. खेड्यात प्रगतीच्या संधी निर्माण व्हाव्यात व त्याचा लाभ समाजातील सर्व घटकांना व्हावा हे डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत होते. दिनदयाल उपाध्याय म्हणाले होते की संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था नव्याने उभी करा’ हे आता घडतांना दिसत आहे. शेतीने व ग्रामीण भागाने बराच अनास्थेचा काळ पाहिला आहे. मात्र आता पुन्हा नव्यानं पहाट फुटतांना दिसत आहे. ग्रामीण व्यवस्थेची पुनर्रचना करण्याची ही संधी आहे. दीर्घकाळ मरगळलेल्या व्यवस्थेला नवी झळाळी मिळण्याच्या दिशेने ही वाटचाल होतांना दिसत आहे. शेतकऱ्यांचे अनेक गट तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या या काळात ज्या झपाटलेल्या पध्दतीने कामाला लागल्या. अत्यंत प्रतिकूल वातावरणातही ग्राहकांना विश्र्वास निर्माण करण्यात त्यांना यश मिळाले. ही धडपड सुरु असतांनाच सरकारनेही या सगळ्या कामाला अनुकुल घोषणा जाहीर केल्या आहेत. हे आश्वासक आहे.
शेतीत बदलाची ताकद
मागच्या ३० वर्षात चीन हा देश झपाट्याने बदलला. तिथल्या सरकारच्या धोरणांनी ग्रामीण जनतेला रोजगार उपलब्ध करुन दिला. मोठ्या प्रमाणात लोकांना गरिबीच्या गर्तेतून बाहेर काढले. तसे बदल आता भारतात घडावे अशी आपल्या सर्वांची दिशा असायला हवी. प्रत्येक पिकाची इंडस्ट्री होणं या पध्दतीनेच कामाची दिशा ठेवून आपल्याला चालावे लागणार आहे. महाराष्ट्रापुरता विचार केला तर तितकी ताकद आपल्यात नक्कीच आहे. महाराष्ट्रातील सर्व पिकांमध्ये अशा १८ पिकांच्या ७०० मुल्यसाखळ्या उभ्या राहू शकतात. या पिकांमधून आजमितीस अडीच लाख कोटीचे उत्पन्न मिळते ते येत्या काळात १० लाख कोटींवर जाऊ शकते. यातून प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे उत्पन्न आपण मासिक ५० हजार रुपयांपर्यंत नेऊ शकतो. अशाप्रकारची ताकद आपल्या शेतीमध्ये आहे. यातून ग्रामीण भागातच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. गांवातील सर्व लोकांना सन्मानजनक उत्पन्न मिळण्याची व्यवस्था उभी राहील. हा विश्वास आहे. ती क्षमता या मुल्यसाखळ्यांमध्ये नक्कीच आहे. या मुल्यसाखळ्या कशा उभ्या राहू शकतील? या विषयी सविस्तर आपण पुढील भागात पाहू या..