अभिमन्यूप्रमाणे शेतकरी लुटीच्या शेती अर्थव्यवस्थेच्या चक्रव्युहात अडकत गेला. ही वस्तुस्थिती आहे. त्याची स्थिती, त्याची कारणं या विषयीची मांडणी खूप झालीय. आज गरज आहे ती या चक्राव्युहातून बाहेर पडण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा मांडणीची आणि त्याच बरोबर ठोस कृतीशील कार्यक्रमाची. अशा मांडणीतून आलेला कृतीकार्यक्रमच पुढील वाटचालीसाठी उपयोगाचा ठरणार आहे

‘शेतकऱ्याचा आसूड’ हा ग्रंथ 1885 मध्ये लिहीला गेला. त्यात महात्मा ज्योतीबा फुले यांनी वर्णन केलेलं शेतकऱ्यांच्या दयनीयतेचं आणि शोषणाचं चित्र आजही बदललेलं नाही. आजच्या काळातील विचारवंत युवाल नोवा हरारी यानेही सेपिअन या पुस्तकातून शेतीच्या संदर्भात अत्यंत वास्तव स्वरुपाची मांडणी केली आहे. ही जर समजून घेतली शेतीचं खरं चित्र लक्षात येईल. हे समजून न घेता शेतकऱ्याला बळीराजा, अन्नदाता वैगरे उपाधी लावून एकप्रकारे त्याला वेड्यातच काढलं जात आहे. वास्तवावर उपाय शोधण्याऐवजी तो आभासी जगात राहील अशीच जणू काळजी घेतली जात आहे.

कृषिक्रांतीचं वास्तव

भटक्या अवस्थेत असलेल्या मानवाला शेतीचा शोध लागला आणि त्याला कृषिक्रांती असं गोंडस नाव दिलं गेलं. शेतकऱ्याच्या बाजूनं विचार केला तर ती इतिहासातील सर्वात मोठी फसवेगिरी होती. अशी थेट अंगावर येणारी मांडणी युवाल नोवा हरारी सेपिअनमध्ये करतात. तेव्हा ते असं का म्हणतात? याचा विचार केला पाहिजे. एका दाण्याचे दहा हजार दाणे निर्माण करण्याची क्षमता फक्त शेतीत आहे. असं म्हंटलं गेलं. माती, सूर्य, पाणी, वायू, अग्नि या पंचमहाभूतांची आराधना करीत माणूस शेती करीत राहीला. वर वर बळीराजा, अन्नदाता म्हणून गौरवल्या गेलेल्या शेतकऱ्याचे प्रत्यक्षात समाजरचनेत वरच्या स्थानी असलेल्यांकडून प्रत्येक काळात शोषणच होत आले आहे. मागच्या दहा हजार वर्षात तरी हेच होत आले आहे.

लुटीचा इतिहास

म. जोतीराव फुल्यांनी 137 वर्षांपुर्वी गुलामगिरी, शेतकऱ्याच्या आसूड मधून या स्थितीचं सविस्तर वर्णन केलं. ऐशीच्या दशकात शेतकऱ्यांची संघटना उभारुन वादळ उठविलेल्या शरद जोशींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अजून आवाज देण्याचं काम केलं. एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी स्वत: कायम अठरा विश्वे दारिद्र्यात का? हे कोडं उलगडण्याचा प्रयत्न जोशींनी केला. त्यातून त्याचं बियाण्यांच्या पेरणीपासून ते बाजारातील मालाच्या उतरंडी मांडेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात शोषणच होतंय. हे त्यांनी फार ठळकपणे मांडलं. मानवी जातीचा मागील दहा हजार वर्षांचा इतिहास म्हणजे शेतकऱ्याच्या लुटीचाच इतिहास आहे. हेच शरद जोशींनीही त्यांच्या साहित्यांतून, भाषणातून पुन्हा पुन्हा सांगितलं आहे.

गुंता कसा सुटेल?

फुले असो जोशी असो की आताचा इस्त्रायल मधील हिब्रु विद्यापीठातील इतिहासकार प्रा. हरारी असो यांनी शेतकऱ्यांचं प्रत्येक टप्प्यातलं शोषण अत्यंत सुक्ष्मपणे मांडलं आहे. धर्माचा अतिरेकी पगडा हा या शोषणाचाच भाग आहे. धर्म हे मानवानेच निर्माण केलेले साधन आहे. मानवाच्या उत्थानासाठीच धर्माचा उद्देश असल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्षात धर्म हे मानवातील विभाजनाचे साधन बनले. यातील देव ही संकल्पनाही मानवनिर्मितच आहे. कुणीतरी अवतार घेईल. कुणीतरी प्रेषित येईल आणि मग आपले प्रश्न सुटतील ही कल्पना वेडगळपणाचीच आहे. आपले प्रश्न हे आपणच सोडवायचे असतात. त्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्नांची गरज असते. इथंच बऱ्याचदा गफलत होते. ही गोष्ट आपल्याला समजून घेत नाही किंवा आपल्याला ते समजून घ्यायचे नसते. आपल्या जगण्याचा आणि शेती व्यवस्थेचा गुंता झालाय. तो बराचसा आपणच करुन ठेवलाय. आता तो गुंता सोडवायचा तर त्याचं मूळ कुठे आहे हे समजून घेतले तर तो आपल्याला सोडवता येणार आहे. सतत हतबलतेची भूमिका घेऊन किंवा व्यवस्थेला दोष देवून गुंता सुटणार नाही.

तोट्यातील शेतीची कारणे

आपली शेती तोट्यात आहे. सातत्याने तोट्यात आहे. हे आजच्या शेतीचं स्वरुप आहे. हे शेतकऱ्यापासून ते अर्थतज्ज्ञांपर्यंत सगळे मान्य करतात. मात्र हा तोटा होतो. म्हणजे नेमकं काय होतं? हा तोटा असा सतत का होतो? निसर्गाच्या नियमाप्रमाणे एका दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता जर शेतीत आहे. म्हणजे हजारपट व्हॅल्यूएशन किंवा मल्टिप्लिकेशन यात होतं, तर शेतीत तोटा होतोच कसा? हे सुत्र नेमकं काय आहे? हे समजून घ्यायला पाहिजे. तोटा होतो म्हणजे नेमकं काय होतं? शेतकऱ्याची लूट होते म्हणून तोटा होतो का? मग ही लूट कोण करतं? दलाल, मध्यस्थ, व्यापारी यंत्रणा किंवा पुर्वीच्या काळी राजेशाही, या व्यवस्था लूट करत आल्या आहेत. हे सगळंच आपण ऐकत, वाचत आणि अनुभवतही आलो आहोत. शेती व्यवस्थेच्या संबंधानं काम करणाऱ्या सर्वच विचारवंतांनी, नेत्यांनी हीच मांडणी पुन्हा पुन्हा केली आहे. यात मांडणी आणि शेतकरी या दोन्हीही गोष्टी त्याच एकसारख्याच आहेत. जो उपेक्षित आहे, शोषित आहे. तो हजारो, शेकडो वर्ष तसाच का? तो बदलत का नाही? त्याची स्थिती, त्याचं चित्र बदलत का नाही? ते कोण बदलणार आहे? हे शोषण, ही अडवणूक थांबणार तरी कधी?

मी शेती का करतो?

आज जर ही मानसिकता पाहिली तर काय दिसतय. मूळात पहिला प्रश्न असा की मी शेती का करतो? तर घरी पूर्वपरंपरांगत, वाडवडिलांपासून चालत आलेला व्यवसाय म्हणून?, दुसरा कुठलाच पर्याय नाही म्हणून? यालाही व्यवसाय म्हणण्यापेक्षा ही आपली संस्कृती आहे. जमीन आहे, पाऊस येतो, मग ती पेरलीच पाहिजे. मागची पिढी करीत आली आहे. हेच आपलं भागधेय आहे. दैव आहे. ही मांडणी केली जाते. किंवा पोटपाणी भरण्यासाठी दुसरं काहीच साधन नाही. म्हणून नाईलाज म्हणून हे करतोय. ही उत्तरे दिली जातात. या पारंपारिक विचाराच्या पलीकडे जाऊन आता विचार करण्याची गरज आहे. या उलट जी गोष्ट मला परवडतच नाही ती गोष्ट मी केलीच पाहिजे का? असा तर कोणत्याही सरकारने नियम केलेला नाही की अमूक व्यक्तीने शेतीच करायची. अमूक एका व्यक्तीनेच शिक्षक व्हायचे. अमूक एकानेच वकील व्हायचे. असा तर कुठलाच कायदाही नाही. आपल्या घटनेप्रमाणे प्रत्येकाला व्यवसाय निवडण्याचं व त्याला जे योग्य वाटेल त्या प्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य आहे.

कृषिप्रधान शोकांतिका

शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपला देश कृषिप्रधान आहे. अशी गोंडस मांडणी करुन आपण आपली समजून करुन पुन्हा स्वत:ला भासमय जगात झाकून घेतो. हे फक्त आपल्याकडेच आहे का? जगात असं दुसरीकडे कुठे नाहीय का? तर याचं उत्तर ही परिस्थिती सगळीकडेच आहे. आज प्रगत व विकसित म्हणविल्या जाणाऱ्या देशात काही शतकांपुर्वी हेच चित्र होतं. चारशे वर्षापुर्वी सगळं जगच हे पूर्णपणे कृषिप्रधान अर्थव्यवस्था असलेलं होतं.

जग बदलले. आपण का बदललो नाही?

कृषिक्रांतीचा काळ हा जगात सारखाच होता. तो भारतात वेगळा आणि युरोपात वेगळा असा काहीच नव्हता. त्यानंतर जगातील अनेक देशांनी काही बदल केले. काही बदल स्विकारले. युरोप, अमेरिका खंडात शेती करणारे 80 टक्क्यावरुन 3 ते 4 टक्क्यावर का आणि कसे आले? बहुतांश लोक शेतीबाह्य इतर व्यवसायात कसे स्थिरावले, याबाबतही विचारमंथन होणं गरजेचं आहे. बाहेर विचारवंत त्यांच्या पध्दतीने हा विषय मांडत राहतात. मात्र हा विषय शेतकरी म्हणून आपण प्रत्येकानं समजून घेतला पाहिजे. शेतीतील समस्यांची कारणे जितकी बाह्य स्वरुपाची आहेत. त्याहून जास्त ती अंतर्गत स्वरुपाची आहेत. हे आता समजून घेण्याची वेळ आली आहे.

वैज्ञानिक दृष्टीकोन हाच पर्याय

हे प्रश्न केवळ सामाजिक, राजकीय चष्मा घालून सुटणार नाहीत. त्यासाठी शास्त्रशुध्द विचारच लागणार आहेत. वैज्ञानिक ज्या प्रमाणे शिस्तबध्द प्रायोगिक मांडणी करुन प्रश्नाच्या मूळापर्यंत जातात. त्याच पध्दतीने शेतीतील समस्यांचे मूळ समजून घ्यावे लागणार आहे. जेव्हा मूळ सापडतं. नेमकं कारण सापडतं. तेव्हा जटील प्रश्नही सोपा वाटायला लागतो. आज आपण पाहतो बऱ्याच शोधांनी जगाचं चित्र बदलण्याचं काम केलं आहे. असे काही शोध परिस्थितीचं चित्र आमुलाग्र बदलून टाकतात.

उदाहरणार्थ आपण थोडं दोनशे-अडीचशे वर्षे मागे जाऊ या. त्या काळात कुणीच टेलिव्हिजन ही कल्पनाही केलेली नसेल, किंवा भविष्यात असं काही घडू शकेल. असा विचारही केला नसेल. रेडीओ, स्वयंचलित वाहने या कल्पना त्याकाळी दैवी कल्पना वाटल्या असतील. नंतरच्या काळात टिव्ही पासून ते मोबाईलपर्यंत जगाचं चित्र अशा शोधांनी बदललं. असे कितीतरी मानवी बुध्दिमत्तेचे अफाट, अचाट प्रयोग येत्या काळात सबंध मानवी जीवन बदलणार आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान असं चारही बाजूनं आपल्या जगण्याचा भाग झालेलं असतानाही शेतीचे प्रश्न, शेतीच्या समस्या वर्षानुवर्षे त्याच त्याच का आहेत? या समस्यांच्या मुळाशी जाण्यासाठी हे विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्याला वापरता येणार नाही का?

अभिमन्यूप्रमाणे शेतकरी लुटीच्या शेती अर्थव्यवस्थेच्या चक्रव्युहात अडकत गेला. ही वस्तुस्थिती आहे. त्याची स्थिती, त्याची कारणं या विषयीची मांडणी खूप झालीय. आज गरज आहे ती या चक्राव्युहातून बाहेर पडण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा मांडणीची आणि त्याच बरोबर ठोस कृतीशील कार्यक्रमाची. अशा मांडणीतून आलेला कृतीकार्यक्रमच पुढील वाटचालीसाठी उपयोगाचा ठरणार आहे..